उद्देश

ऊस विकास उपक्रम

सभासदांना आधुनिक पध्दतीने मोठ्या प्रमाणावर शेतीच्या उत्पादनाचा जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्याच्या हेतूने शेतीविषयक सुधारलेल्या पध्दतीचा अवलंब करुन आणि सहकारी तत्वावर शेती करण्याची पध्दती अंमलात आणून सभासदांमध्ये शेतीची, शेतकी उद्योगधंद्याची व जोडधंद्यांची सहकारी तत्वावर योग्य रितीने वाढ होण्यास सक्रिय उत्तेजन देणे, हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे आणि तो साध्य करुन घेण्यासाठी संस्था खालील गोष्टी करील.

  • सभासदांमध्ये स्वावलंबन, काटकसर व सहकार्य वाढविण्यास उत्तेजन देणे.
  • कारखान्यास गळीतासाठी लागणा-या उसाच्या पुरवठ्यास विलंब लागू नये व ऊसाचे वजन व साखर उता-यातील संभाव्य घट टाळण्यासाठी सभासदांच्या ऊसाची लागवड, तोडणी व वाहतूकीची योजना आखणे.
  • सभासदांमध्ये व कार्यक्षेत्रातील शेतक-यांमध्ये शेती व ऊस- उत्पादनाच्या आधुनिक पध्दतीचा प्रसार करणे, ऊस व अन्य पिके घेण्यासाठी बियाणे, खते व शेती अवजारे तयार करणे. अगर सभासदांना त्याचा पुरवठा करणे, शेती उद्योगाचे प्रशिक्षणाला उत्तेजन देऊन सभासदांचा सर्वांगीण विकास व कल्याण साधण्यासाठी पोषक बाबी हाती घेणे.
  • सभासद व इतरांकडून पुरविलेल्या उसापासून साखर, कच्ची साखर, सहवीज निर्मिती प्रकल्प, आसवनी, इथेनॉल, अल्कोहोल, स्पिरीट, बायोगॅस, खत निर्मिती व पेपर निर्मिती इत्यादी पुरक उत्पादने निर्माण करणे आणि योग्य मोबदल्यात त्यांची विक्री करणे.
  • संस्थेच्या विकासास व कल्याणास सहाय्यकारी होतील अशा दुय्यम व पूरक उद्योग संस्था स्थापन करणे व कार्यक्षेत्रातील लोकांच्या कल्याणास व विकासास सहाय्यभूत होतील अशा दुय्यम व पूरक संस्था स्थापन करण्यास उत्तेजन देणे.
  • संस्थेच्या कार्यक्षेत्रातील शेतक-यांसाठी पाणीपुरवठा योजना, शेती सुधारणा योजना व जोडधंद्यांच्या योजना इ. शेती विकासाच्या योजना तयार करणे, त्यात सहभागी होणे अगर त्या राबविणे. पाणीपुरवठा योजना पूर्ण अंमलात आल्यावर संबंधीतांच्या स्वतंत्र सोसायट्या निर्माण करुन ती पाणीपुरवठा योजना त्यांच्या ताब्यात देणे. योजना राबविण्यासाठी तारणावर पैसा उभारणे.
  • ऊस कारखान्यावर आणण्यास किमान खर्च व वेळ लागावा म्हणून संस्थेच्या कार्यक्षेत्रात नवीन रस्ते बांधणीचा कार्यक्रम हाती घेणे, अस्तित्वात असलेल्या रस्त्यांची निगा राखणे, रस्त्यांची कामे कंत्राटाने देणे व त्यासाठी स्थानिक लोक वा संस्था व सरकार यांचेकडून आर्थिक मदत मिळविणे. 
  • संस्थेचे सभासद, कर्मचारी व संस्थेच्या कार्यक्षेत्रात राहणा-या लोकांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व आर्थिक विकास करण्याच्या दृष्टिने निरनिराळ्या योजना हाती घेणे, त्या कार्यवाहीत आणणे, चालविणे व त्यासाठी होणारा खर्च भाग विकास निधीतून करणे. 
  • संस्थेचे कर्मचारी, सभासद व संचालक मंडळाचे सदस्य यांना आवश्यक ते प्रशिक्षण देणे.
  • संस्थेचे वरील उद्देश साध्य करण्यासाठी इतर सर्व अनुषांगिक असणा-या बाबी हाताळणे.